नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी चैत्र महिन्याची शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे. गुढीपाडवा हा सण विजय आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. हा सण आपल्याला आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची आणि नवीन उद्दिष्टे निश्चित करण्याची प्रेरणा देतो.
हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्व आहे. नवीन वर्षाचा पहिलं दिवस असल्याबरोबरच अनेक पैलूंनी या दिवसाला पहिलं जातं. गुढीपाडव्याचे या समस्त सृष्टीच्या निर्मितीशी एक अनोखे नाते सांगितले जाते. हिंदू धर्मानुसार, भगवान ब्रह्मा यांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली अशी धारणा आहे.
त्याचप्रमाणे श्री शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरुन युद्ध जिंकल्याने या युद्धाचा विजय साजरा करण्यासाठी या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच श्रीरामांशीही हा दिवस जोडला जातो. हिंदू मान्यतेनुसार भगवान श्रीराम वनवास पूर्ण करून अयोध्येत याच दिवशी परत आले होते.
त्यामुळे हा दिवस विजयाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचाही या सणाशी असणारा संबंध सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची घोषणा याच दिवशी केली होती, असे म्हणतात. त्यामुळे हा दिवस मराठी माणसासाठी विशेष महत्वाचा आहे.
गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करण्यात सगळ्यात महत्वाची प्रथा म्हणजे गुढी उभारणे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. बांबूच्या काठीला रंगीत कपडा, कडुनिंबाचा पाला , साखरेच्या गाठीची माळ , हार-फुले आणि पानांची तोरणं बांधून ‘गुढी’ बनवली जाते. काही ठिकाणी गुढी उभारण्यासाठी साडीचाही वापर करतात. ही गुढी घरासमोर उभारली जाते.
गुढीची मनोभावे पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडूनिंबाची पाने आणि गूळ वाटला जातो. शहरीकरणामुळे आजकाल घरांना अपुरे अंगण असते. फ्लॅट पद्धतीच्या घरांना दारात गुढी उभारण्याची सोय नसते. अशावेळी गुढ्या बाल्कनीतही उभारल्या जातात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वर्षाच्या पंचांगाचे पूजन केले जाते. गुढीपाडव्यादिवशी नवीन वर्षाचे पंचांग वाचून त्यातील शुभ-अशुभ गोष्टींची माहिती घेतली जाते. येणारे वर्ष कसे जाईल याचा साधारणपणे ढोबळ अंदाज बांधण्याचा प्रयत्न या पंचांगाद्वारे केला जातो.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरातील तसेच नात्यांतील वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात. मोठ्यांच्या आशीर्वादा घेण्यासाठी आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात. या मराठी नवीन वर्षाची सुरुवात नवीन कपडे घालून, मिठाई वाटून आणि कुटुंबियांसोबत भोजन करून केली जाते.
पारंपरिक पद्धतीनुसार साग्रसंगीत पुरणपोळीचा बेत केला जातो. आधुनिकीकरणाने जीवनशैली बदलत चालली असल्याने काही बदल सण साजरे करण्याच्या पद्धतीतही दिसून येतात. ग्रामीण भागात मात्र पाडवा आजही तितक्याच पवित्र्याने आणि पारंपरिक रीतीने साजरा केला जातो.
विविध भागामध्ये गुढीपाडवा साजरा करण्याच्या रीतीरिवाजांमध्ये थोडा फरक दिसून येतो. गुढीपाडवा महराष्ट्रासोबतच कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सर्वात मोठया सणांपैकी एक मानला जातो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे लोक घरोघरी गुढी उभारतात, नवीन कपडे घालतात, मिठाई वाटतात आणि सण अतिशय उत्साहात साजरा करतात.
तसेच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ‘उगादि’ नावाचा सण गुढीपाडव्यासारखाच साजरा केला जातो. कर्नाटकात ‘युगादी’ नावाचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मप्रमाणेच सिंधी समाजातही हा सण साजरा केला जातो.
सिंधी समाजामध्ये गुढीपाडवा “चेटीचंड” नावानं साजरा केला जातो. सणाची नावे भाषा आणि संस्कृतीनुसार बदलत असली तरी त्यामागची भावना आणि उत्साह मात्र तोच असतो. हा उत्साहच माणसांना एकमेकांशी बांधून ठेवतो. “वसुधैव कुटुंबकम” ही हिंदू धर्मातील मुख्य संकल्पना या सणांमुळेच तर आजही टिकून आहे.
यंदाचा गुढीपाडवा शुभ मुहूर्त:
या वर्षी गुढीपाडवा मंगळवार, ९ एप्रिल रोजी साजरा केला जाईल.
प्रतिपदा तिथी प्रारंभ: ८ एप्रिल २०२४, रात्री ११:५०
गुडीपाडवा पूजा मुहूर्त: ९ एप्रिल २०२४, सकाळी ६:४६ ते ९:२२
पूजा विधी:
- सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा.
- आंघोळ करून नवीन कपडे घाला.
- घरासमोर गुढी उभारा. गुढी उभारताना पूजा मुहूर्त लक्षात घ्यावा.
- घरात रांगोळी काढा आणि देवघराची सजावट करा.
- गणपती, शिव-पार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करा.
- गुढीला पूजा करा आणि नारळ फोडा.
- पंचांग पूजन करा आणि नवीन वर्षाची शुभेच्छा द्या.
- कुटुंबियांसोबत मिळून गोड पदार्थ आणि भोजन करा.
एकंदरीत सांगायचं तर गुढीपाडवा हा सण नव्याची सुरुवात आणि आशावाद दर्शवतो. हा सण आपल्याला नवी दिशा आणि नव्या सुरुवातीचा उल्हास देतो. त्याच उत्साहाने नव्या वर्षाची सुरुवात करूया. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
मोबाईल वरून सुरू करता येणार बिझनेस, ड्रॉपशिपिंग बिझनेस!
इंडियामार्ट म्हणजे काय? त्यातून व्यवसायात फायदा कसा होईल? चला बघुयात.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes For Husband In Marathi
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री: तिन्ही पद्म पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…